बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

भटकंती साजी व कुसूर घाटवाटांची

काही अपरिहार्य कारणांमुळे 26 आणि 27 जानेवारीला ठरवलेला साजी घाट आणी कुसुर घाट हा ट्रेक रिशेड्यूल करायला लागला. नवीन तारखा ठरल्या 16 आणि 17 फेब्रुवारी. १६ तारखेला ठरवल्याप्रमाणे मी व भूपेंद्र कर्जत कर्जत स्टेशनला कल्याण व ठाणे येथून पोहोचलो. पुण्यावरून रूपक साने, ज्योती साने आणि रोहित दातार हे तिघेजण सिंहगड एक्सप्रेस ने कर्जतला पोचले. (८: १५)
स्टेशन वरील कॅन्टीन मध्ये चहा नाश्ता उरकला.(८: ३५)
कर्जत स्टेशन वरून विजय थोरवे यांच्या ऑटोरिक्षाने टाटा हायड्रो पॉवर स्टेशन गाठले. (९: २५)


 टाटा पॉवर स्टेशन च्या अधिकार्‍यांनी उदार मनाने परवानगी दिल्याने (९:५०) टाटा पॉवर स्टेशनच्या पार्किंग जवळील असलेल्या धनगरवाड्यात पोहोचलो.(१०: ०५) धनगरवाड्या पासून एक घाट वाट सरळ कुसुर गावाला जाते. ही वाट स्थानिक ग्रामस्थांमध्ये *साजी घाटाची वाट* म्हणून ओळखली जाते. धनगर वाड्या पासून एका सोंडेवरील वाटेने वरच्या जंगल टप्पा सुरू होणाऱ्या नळीपाशी पोहोचलो (१२:३०). (ह्या सोंडेवरच्या वाटेवरती दोन ठिकाणी खडक कोरून पायऱ्या काढलेल्या आहेत.)


जंगल टप्पा गाठल्यावर वाटेने आडवी फिरत उजवीकडील कुसूर घाटाच्या अलीकडील नळीमध्ये पोहोचलो(१३:३०)
नळीतून थेट घाटमाथा गाठला.(१४:००)



आता सकाळी केलेला नाश्ता जिरला होता. भूपेंद्रने आणलेले पराठे, सानेंची पोळीभाजी, रोहितची गूळ पोळी व माझ्या कडील पुरणाच्या पोळीने भूक भागवली. पेशवाई थाटाच्या ह्या जेवणा नंतर तासभर वामकुक्षी अत्यावश्यक होतीच. वामकुक्षी झाल्यावर आसमंत न्याहाळला तर सिद्धगड, भीमाशंकर जवळील तुंगी डोंगर, खांडीच्या मिसाळवाडीजवळील चौर्‍याचा डोंगर, वांद्रे खिंड, वरसूबाई ते तासूबाई डोंगररांग, कुसूर गावाजवळील कुसूर पठार, ढाकचा किल्ला व ढाक पठार, माथेरान, पेबचा किल्ला, नाखिंदा डोंगर, चंदेरी, बदलापूर टेकड्या असे चौफेर दृश्य दिसले.
मुक्काम कुसुर गावाजवळील कुसुर घाटाच्या वाटेवर असलेल्या विहिरीपाशी केला.




ह्या विहीरीचे पाणी बारा महिने उपलब्ध असते. कुसुर गावातील श्री. चिंधु तुर्डे (वय ७०) यांनी गावाबाहेर असलेल्या बारमाही पाण्याची विहीर दाखवली. विहीरी जवळील सपाट जागेवर दगडी चूल पेटवून चहा बनवला. रात्रीच्या जेवणासाठी टोमॅटोसूप व डाळ तांदळाच्या खिचडीचा फक्कड बेत होता.
रात्री उघड्यावरचा मुक्काम आणि घाटमाथ्यावरची थंडी त्यामुळे पाच जणांचा चमू दोन गटांमध्ये विभागला गेला. तिघांनी तंबूमध्ये आणि दोघांनी चिंधु तुर्डे यांच्या घरात मुक्काम करावा असे ठरले.
रविवारी म्हणजे दुसर्‍या दिवशी दिवशी १७ तारखेला कुसूर घाटाने भिवपुरी गाठायची होती
सकाळी ८: १५ वाजता विहीरीला लागूनच असलेल्या पायवाटेने कुसुर घाटाची नळी उतरायला सुरुवात केली. गर्द झाडी असलेल्या या नळीमधून खालच्या पदरामध्ये उतरलो (९:१५).















पदराच्या शेवटी निसणी ची वाट एकत्र येते. येथून तीव्र उताराने खालच्या टप्प्यात ऊतरलो.(९:४५)












आता कुसूर घाटाची जुनी वाट सोबतीला आली, आणी हे पण समजले की वरच्या टप्प्यात खरी वाट आमच्या नजरेआड झाली असणार. असो.
तीव्र वाट उतरत असताना वाटेवर असण्याऱ्या पाच टाक्यांची जागा दिसली होती. टाक्या पाहून लिंबू सरबताचा आस्वाद घेतला (१०: ४०)





या टाक्यांपासून खाली जंगल टप्प्यातून जात दळवी फार्म जवळून भिवपुरी भिवपुरी गाव गाठले. (११: २५)
श्री. विजय थोरवेंनी आधी ठरल्या नुसार परत कर्जत स्टेशन वर सोडले. (१२:३०)

एकूण खर्च
कर्जत नाष्टा पोहे, मेदूवडा व चहा रू १८५/-
रिक्षा भाडे कर्जत ते टाटा पॉवर रू३००/-
रिक्षा भाडे भिवपूरी ते कर्जत रू ४००/-
प्रत्येकी रू १७७/-

सहभागी
प्रसाद काशीकर
रूपक साने
ज्योती साने
भूपेंद्र वैद्य
रोहित दातार
छायाचित्रे
प्रसाद, भूपेंद्र, रोहित